गुलामगिरी
गुलामगिरी ही श्रमिकांच्या शोषणाची एक पद्धत आहे. ज्या व्यवस्थेत माणसांना कोणाचीतरी मालमत्ता समजले जाते आणि बळाचा किंवा धाकाचा वापर करून काम करायला लावले जाते, तिला सर्वसाधारणपणे गुलामगिरी किंवा गुलामी अशी संज्ञा आहे. गुलामांना त्यांच्या इच्छेविरुद्ध विकत घेण्यात येत असे किंवा ते जन्मापासूनच गुलाम समजले जात असत. काम सोडून जाण्याचा, कामास नकार देण्याचा किंवा कामासाठी मोबदला मागण्याचा अधिकार त्यांना नसे. काहीं जुन्या गुलामगिरीच्या व्यवस्थांमध्ये मालक गुलामांना ठारही मारू शकत आणि ते कायद्यात बसत होते. इतिहासातील अनेक समाजांनी गुलामगिरीची पद्धत उघडपणे मान्य केली होती. आधुनिक काळात जगभरातील बहुतांश ठिकाणी गुलामगिरी जरी बेकायदा असली, तरीही ती काही स्वरूपात चालू आहेच. उदा: धन्याच्या कर्जात अडकलेले नोकर, घरी कायमस्वरूपी ठेवलेले नोकर, दत्तक घेतलेल्या मुलांचा नोकर म्हणून वापर, मुलांचा सैनिक / क्रांतिकारी / दहशतवादी म्हणून वापर, जबरदस्तीने केलेले लग्न, कामेच्छेसाठी वापरले जाणारे किंवा पुरविले जाणारे गुलाम, इ.
गुलामगिरी माणसाच्या लिखित इतिहासाच्याही पूर्वीपासून अनेक संस्कृतींमध्ये चालू होती. आज जगात उपरोक्त प्रकारच्या गुलामांची संख्या १.२ ते २.७ कोटी असावी असा अंदाज आहे, पण एकंदरीत लोकसंख्येच्या मानाने हे प्रमाण ऐतिहासिक प्रमाणांपेक्षा अत्यल्प मानता येईल. यातील सर्वाधिक संख्या दक्षिण आशियातील कर्जबाजारी झालेल्या नोकरांची आहे. अनेकदा ही गुलामी पिढ्यानपिढ्या चालू राहते. बायका आणि मुलांचे लैंगिक शोषण आणि त्यासाठी त्यांची केली जाणारी आयात-निर्यात हा गुलामगिरीचा एक स्वतंत्र भागच आहे.
[संपादन] शब्दाचे मूळ
गुलाम हा मूळ अरबी भाषेतील शब्द असून त्याचा अर्थ सेवक असा होतो. नंतर तो बहुधा मध्ययुगीन काळात उर्दू व अन्य भारतीय भाषांमध्ये आला असावा[ संदर्भ हवा ]. संस्कृतम भाषेत मात्र हा शब्द आढळत नाही.
[संपादन] इतिहास
उद्योगीकरणाच्या आधी गुलाम आणि त्यांची श्रमशक्ती यांना आर्थिक दृष्टीने मोठेच महत्त्व होते. यंत्रयुगात मानवी श्रमांचे आर्थिक महत्व कमी होत चालले आहे. नोरबेर्त विनर म्हणतात: "यंत्र शक्तीमध्ये मानवी श्रमांचे आर्थिक मूल्य आहे, पण गुलामगिरीत जी क्रूरता असते ती नाही."
इ.स.च्या १९व्या शतकापासून इंग्रजीत गुलामगिरी (इंग्लिश: Slavery, स्लेव्हरी) हा शब्द अमेरिकेतील गोर्या कातडीच्या माणसांनी काळ्या कातडीच्या माणसांच्या केलेल्या गुलामी बद्दल जास्त करून वापरला गेला आहे.
[संपादन] बाह्य दुवे
- हिस्टरी.कॉम - गुलामगिरी (इंग्लिश मजकूर)
- स्लेव्हरी म्यूझियम, युनायटेड किंग्डम - गुमागिरीविषयक संग्रहालय (इंग्लिश मजकूर)
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |