गुराखी साहित्य संमेलन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

गुराखी साहित्य संमेलन हे नांदेड जिल्ह्याच्या लोहा तालुक्यातील गुराखीगडावर प्रतिवर्षी २६ ते २९ जानेवारी या दरम्यान भरवले जाते [१]

व्याख्या[संपादन]

गुराखी साहित्य संमेनलनाचे प्रणेते केशवराव धोंडगे यांनी गुराखी साहित्याच्या अनेक व्याख्या केलेल्या आहेत.

  • रामपहारी तांबडफुटीच्या लालभडक रंगाने, शुक्राच्या चांदणीने अक्षरबद्ध केलेले अमर साहित्य म्हणजे गुराखी साहित्य.
  • निसर्गाच्या कण्हण्याच्या हुंदक्याला साथ देणारे साहित्य म्हणजेच गुराखी साहित्य.
  • कापूस वेचताना, साळी कांडताना मुखातून बहरलेले अमर साहित्य,श्रमपालांची गौरवगाथा म्हणजेच हे गुराखी साहित्य.
  • मुक्या गुराढोरांची शेपटी धरून कैलासी उड्डाण मारणारी साहित्यसेवा म्हणजे गुराखी साहित्य.

सुरुवात[संपादन]

केशवराव धोंडगे यांनी २६ जानेवारी, इ.स. १९९२ पासून गुराखी साहित्य संमेलन सुरू केले. शेतकरी कामगार पक्षाचे भाई केशवराव धोंडगे या मौखिक साहित्य संमेलनाचे प्रणेते होत.[१] इ.स. १९९४मध्ये व इ.स. १९९५मध्ये आचारसंहितेमुळे, इ.स. २०११ मध्ये कडाक्याच्या थंडीमुळे संमेलन रद्द केले गेले होते.[२]

मिरवणूक[संपादन]

संमेलनाच्या पहिल्या दिवशी मिरवणुकीत गुराख्यांबरोबर उंट, रोही, साप, नंदी, गाढवे, माकडे, गाई, बैल आदी प्राणी सहभागी होतात. कामाईच्या मंदिरात अध्यक्ष व उद्घाटकांच्या हस्ते पूजा होते. त्यावेळी झाडावर शर्ट, टोपी, चड्ड़्या घातलेली माकडे उड्या मारत असतात. त्याचवेळी गण सुरू होतो. गण संपला की कामाईची पूजा बांधली जाते. दुसरीकडे वासुदेव, पोतराज, गोंधळी, फकीर जथ्याजथ्याने थांबलेले असतात. चुडबुडकेवाले, सापवाले, उंटवाले, कावडीवाले, मांग, गारूडी, मसणजोगी, ताशेवाले, आपापले ताशे, हलग्या वाजवितात. संबळवाले, पिपाण्या वाजविणारे आपापले वाद्य वाजवितात. त्यावेळेस मोर, लांडोर त्या ठिकाणी नृत्य करतात. कामाईच्या मंदिरातील पूजा संपल्यावर सर्व गुराखी दिंडीच्या रूपात गुराखीगडाकडे जातात. या दिंडीत सर्वांच्यासमोर मलखांबावर पहिलवान कसरती करत असतात. हा मलखांब बैलगाडीवर ठेवलेला असतो. त्याच्या मागे सनई, बाज्याच्या हलग्या कडाडतात. त्यांच्या मागून कावडीवाल्यांचा जथ्था असतो. त्यांच्या मागे पळसाच्या पानाच्या टोप्या डोक्यावर घातलेले गुराखी असतात. त्यांच्या मागे मसणजोगी, त्यांच्यामागे वासुदेव, नंतर गोंधळी, नंतर मांगगारूडी, नंतर पोतराज व नंतर फकिरांचा जथ्था आपापल्या वाजंत्र्यांसह वाजत-गाजत-नाचत चालत असतो. यांच्या मागे चुडबुडकेवाले, नंतर बासरीवादक, त्यांच्यानंतर गळ्यात मोठेमोठे साप अडकवलेले सापवाले असतात. त्यानंतर गाढवांवर लगडी ठेवून चालणारा कुंभारांचा समूह असतो. त्यांच्यामागे गाई, गाईंच्यानंतर रोही, नंतर उंटांचा लयबद्ध तांडा, पोपटवाले, माकडवाले, अस्वलवाले, पहिलवान, भविष्यवाले, गोंदणाऱ्या बाया, तमासगीर हे सर्व आपापल्या वेषभूषेत गुराखीगडाकडे जातात. ही मिरवणूक जवळजवळ अडीच मैल लांबीची असते.

सहभाग[संपादन]

भटक्या आणि विमुक्त समाजातील वासुदेव, गोंधळी, मसणजोगी, फासेपारधी, वडार, तुडबुडके, फकीर, गारुडी, पोतराज, चाळणीवाले, मनकवडे अशा विविध समुदायातील लोक या संमेलनात सहभागी होतात.[१]

गुराखीपीठ[संपादन]

या संमेलनाच्या व्यासपीठाला गुराखीपीठ असे संबोधले जाते. मधमाशांचे पोळे, वाळुक, चिमणीचे खोपे, शिकाळे, मुंगुस, वांगी, गाजरे, बोरे, बिब्याच्या माळ्या, पपया, आंब्याची पाने, खारीक, खोबरे, कांद्याची पात आदी रानमेव्यांनी गुराखीपीठ सजविले जाते.[१] गुराखीपीठावर जागोजागी गुराखी ध्वज लावलेला असतो. या ध्वजावर श्रीकृष्ण आणि गुराखीराजा अशी अक्षरे असतात. गुराखीपीठावर दहिहंडी लोंबकळत ठेवलेली असतात. गुराखीपीठावर अध्यक्ष, उद्घाटक, प्रमुख पाहुणे, गुराखी कलावंत यांच्यासह शेळ्या, मेंढ्या, गाई-वासरं, मोर, कबुतरे, ससे, कोल्हे, माकडं, चिमण्या, राघू-मैना, खडोळी, अस्वलं तर गुराखीपीठाच्यावर चिमणीचे खोपे, शिकाळे, वाळकं, काकडी, लचकन, गोफणी, चाबूक, बिब्यांच्या माळा, गुंजांच्या माळा, पपया, आंब्यांच्या पानांची तोरणे, खारीक-खोबर्यांच्या माळा, शंख इत्यादींच्या माळा, गुराखीपीठाच्या डाव्या-उजव्या बाजूला बिब्याची भट्टी, हुडके इत्यादी साकारलेले असते. कार्यक्रमास वंदे मातरम या गीताने सुरूवात होते. जागतिक शांततेसाठी आकाशात कबुतरे सोडली जातात. नंतरच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनकवडे यांच्याकडे अससते. एक मनकवडा गुराखीपीठावर आपल्या दोन साथीदारांसह तर दुसरा समोरच्या प्रेक्षकातून हातांच्या बोटांद्वारे इशारे करतो. गुराखीपीठावरील मनकवडा सांकेतिक भाषेतले हे शब्द ओळखून त्याचा ध्वनीतून उल्लेख करतो. याच सूत्रसंचलनातून चकमक आणि गारगोटीतून विस्तव झाडून दीप प्रज्वलित केला जातो आणि वाद्याच्या बेसुमार गजरात गुराखी साहित्य संमेलनाचे उद्घाटन होते.

संदर्भ[संपादन]