गायत्री मंत्र

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
राजा रवी वर्मा द्वारा चित्रित गायत्री देवी

गायत्री मंत्र हा ऋग्वेदातील एक श्लोक आहे[१]. हा श्लोक हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा श्लोक असून तो देवी गायत्रीच्या रूपातही कल्पिला जातो. हिंदू धर्मात देवी गायत्री ब्रह्मदेवाची पत्नी व चार वेदांची माता मानली जाते.

गायत्री मंत्र येणेप्रमाणे

ॐ भूर्भूवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धीयो यो नः प्रचोदयात्।

मंत्राचा अर्थ: विश्वाची उत्पत्ती ज्याच्यापासून होते; त्याचे आम्ही ध्यान करतो. तोच सच्चिदानंदरुप आहे. तो अज्ञानाचा नाश करतो. तो आमच्या बुद्धीला प्रेरणा देतो. त्याच्या तेजाचे आम्ही ध्यान करतो. आमची सत्कर्म -सद्विचार-सदाचार-सद्माषण सद्वर्तनाकडे प्रवृत्त होवोत. [२]

देवी गायत्रीची तीन रूपे मानली जातात.सकाळी ती रक्तवर्णी अक्षमाला-कमण्डलुधारिणी ब्राह्मी असते. मध्याह्नी ती शङ्ख, चक्र, गदा धारणकारिणी वैष्णवी असते व संध्याकाळी ती वृषभारूढ़ा, शूळ, पाश, नरकपाल धारिणी वृद्ध शिवाणी असते.

शब्द-कल्पद्रुमानुसार एकदा ब्रह्मापत्नी सावित्रीस यज्ञस्थळी प्रवेश नाकारण्यात आला. क्रुद्ध ब्रह्मदेवाने दुसऱ्या स्त्रीसोबत विवाह करून यज्ञ समाप्त करण्याची इच्छा धरिली. त्याच्या इच्छेनुसार वधू शोधन करताना इंद्रास एका गवळ्याची पोर मिळाली. विष्णूच्या सल्ल्यानुसार या मुलीशी ब्रह्मदेवाने गांधर्वविवाह केला. ही मुलगीच गायत्री होय.[३]

गायत्रीच्या ध्यानानुसार ती सूर्यमण्डलात मध्यस्थानी असून ब्रह्म विष्णू वा शिवरूपिणी आहे. यज्ञोपवितधारी ब्राह्मणांनी त्रिकाळ गायत्रीचा मंत्रजप करणे अपेक्षित असते. गायत्रीची स्तुती छांदोग्य उपनिषद व बृहदारण्यक उपनिषद या वैदिक ग्रंथात केली आहे. [४] वैदिक गायत्री मंत्राधारे इतर देवतांच्या गायत्री रचण्यात आल्या आहेत.

संदर्भ[संपादन]

  1. ऋग्वेद ३.६२.१०
  2. http://www.marathimati.com/balmitra/ShubhamKaroti/GayatriMantra.asp
  3. पौराणिका (विश्वकोष हिन्दुधर्म), प्रथम खण्ड, फार्मा केएलएम प्राइव्हेट लिमिटेड, कलकाता, २००१
  4. http://www.eaglespace.com/spirit/gayatri.php