गगनगिरी महाराज

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
गगनगिरी महाराज

गगनगिरी महाराज समाधी खोपोली
जन्म ३० नोव्हेंबर १९०६ (दत्त जयंती)
निर्वाण ४ फेब्रुवारी २००८
समाधिमंदिर खोपोली
संप्रदाय नाथ
भाषा मराठी
कार्यक्षेत्र भारत
संबंधित तीर्थक्षेत्रे खोपोली,किल्ले गगनगड,दाजीपूर,नागार्जुनसागर,मनोरी तीर्थक्षेत्र ,राजापूर,सोलगाव,आंबोळगड

स्वामी गगनगिरी महाराज हे भारतातील आधुनिक योगी व संत होते । महाराज हे नाथपंथिय हठयोगी व जलतपस्वि म्हणून देशभरातील साधू संतांमध्ये विख्यात होते । स्वामी गगनगिरी महाराज हे दत्तावतारी संत मानले जातात ।

जीवन[संपादन]

गगनगिरी महाराज हे चालुक्य सम्राट पहिल्या पुलकेशीन ह्यांच्या घराण्यातील होते । श्रीपाद गणपतराव पाटणकर (साळुंखे) हे त्यांचे मूळ नाव. त्यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात असलेल्या मणदुरे या ग्रामी १९०६ मध्ये झाला.[१] त्यांच्या वडिलांचे नाव गणपतराव व आईचे नाव विठाबाई. महाराजांचे वय तीन वर्षे असतानाच त्यांचे आईचे व महाराज पाच वर्षाचे असतानाच वडिलांचे निधन झाले ।

लहानपणापासूनच त्यांना ईश्वरप्राप्तीची ओढ होती. वयाच्या सहाव्या वर्षी त्यांनी घर सोडले. सुरुवातीपासूनच ते नाथ संप्रदायाच्या संपर्कात आले, नाथसंप्रदायींबरोबर ते बत्तीसशिराळा येथे आले । तेथे वयाच्या सातव्या वर्षी नाथसंप्रदायाची दीक्षा मिळाली । पुढे चित्रकूट पर्वतावर त्यांची चित्रानंदस्वामी यांची भेट झाली. तद्नंतर त्यांनी पायी भारत भ्रमण सुरू केले। काश्मीर ,लडाख येथील हिमालयातून ते सिंधु नदीच्या खोऱ्यातून भ्रमण करीत करीत हिमाचल प्रदेश ओलांडून बद्रीनाथला आले ।

एकदा बद्रीनाथजवळील व्यासगुंफेत महाराज अतिशय दमूनभागून पहुडले होते. तेव्हा पर्वतावरून एक कफनीधारी साधू आले. साधूंनी त्यांच्या कमंडलूतील पाणी श्रीपाद यांच्या तोंडावर शिंपडले व कमंडलूतील हिरवेगार कोथिंबिरीसारखे गवत खायला दिले. त्या साधूंनी श्रीपाद यांना सांगितले आजपासून तुला सर्वसिद्धावस्था प्राप्त होईल. सर्व मानवांचे कल्याण तुझ्या हातून होईल. तू आता दक्षिणेकडे चालत रहावे. त्याप्रमाणे श्रीपाद हे त्या खोऱ्यातून चालत हालअपेष्टा भोगत भोगत ऋषीकेशला येऊन पोहोचले. नंतर त्यांनी सर्व भारतभर एकट्यानेच फिरण्याचे ठरवले त्याप्रमाणे त्यांनी प्रवास सुरू केला.

थोड्याच दिवसांत श्रीपाद यांना लोक स्वामी किंवा महाराज या नावांनी ओळखू लागले. महाराज हरिद्वारपासून दिल्लीपर्यंत पायी प्रवास करत आले. तसेच ते पुढे भोपाळपर्यंत पायी गेले. तेथे एका तलावाच्या काठी स्नान करून स्थिर बसले होते. त्या वेळी त्यांच्याजवळच कोल्हापूरचे राजे व काही सरदार सहज येऊन थांबले होते. त्यांची मायबोली मराठी असल्याने हे बालयोगी (गगनगिरी महाराज) त्यांच्याशी मराठीत बोलू लागले. महाराजांच्या तेजाने प्रभावित होऊन कोल्हापूरचे महाराज बालयोगी (गगनगिरी महाराज) यांना कोल्हापूरला घेऊन आले. पुढे त्यांनी दाजीपूर येथे अनेक वर्षे तप केले.[२]

सुरुवातीला महाराज एका धनगरवाड्याच्या कडेला थोड्या अंतरावर झोपडी बांधून राहिले. त्या अरण्यात कंदमुळे, झाडपाला, वनस्पती भरपूर असल्याने त्यांचे मन तेथे रमले. पुढे-पुढे ते झाडांच्या ढोलीत राहून तप करू लागले. भूतविद्या, जारण-मारण-उच्चाटन विद्या, बहुरंगी विद्या अशा नाना प्रकारच्या विद्यांचे शोध व तप करू लागले. या तपात त्यांनी झोपण्यासाठी जी गवताची गादी केली होती, ती गादी झाडासारखी वाढू लागली व त्याला अंकुर येऊ लागले; त्यामुळे त्यांना विद्या पक्क्या झाल्याचा अनुभव येऊ लागला. त्या ठिकाणी पुन्हा पुन्हा कायाकल्प करून ते निरनिराळया विद्यांचे शोध लावू लागले व ते सिद्ध होऊ लागले. महाराज त्या जंगलातच एका झाडाच्या ढोलीत निवारा बांधून रहात. पाऊस पडण्याअगोदर अंगावर वस्त्र निर्माण करण्यासाठी कुंभ्याच्या सालीचा वाक, आपट्याच्या झाडाच्या सालीचा वाक व पळसाच्या पानाचे इरले करून पावसापासून बचावासाठी डोक्यावर चालते घर तयार करीत असत. वरील झाडांच्या वाकापासून लंगोट्या, टॉवेल, अंगावर घेण्याच्या शाली, अंथरुण, पांघरूण अशा प्रकारची नवीन नवीन वल्कले धारण करून पावसाळयाच्या दिवसांत या इरल्याखाली रहायचे आणि तप करायचे. असे जीवन जगणे त्यांना आवडत होते. पुढे भ्रमण करीत करीत महाराज गगनगडावर पोहोचले. तिथे त्यांनी जलतपश्चर्या केली.

नाथ संप्रदायातील महंताबरोबर ते संपूण भारतभर फिरले, नेपाळ, भूतान,मानससरोवर, गौरीशंकर, गोरखदरबार, गोरखपूर, पशुपतीनाथ येथून ते अल्मोडा येथे गेले. गंगा नदीच्या खोरे, हिमाचल प्रदेश येथूनही त्यानी आध्यात्मिक ज्ञान संपादण्यासाठी प्रवास केला ।

महाराजांनी अनेक वर्ष व्यसनमुक्ति साठी सामान्य जनमानसात प्रबोधन व मार्गदर्शन केले । निसर्गाबद्दल अत्यंत प्रेम असलेले महाराज नेहमी निसर्ग संवर्धन व संगोपना चा उपदेश देत असत या स्वतः वृक्षारोपण, वृक्ष संवर्धन आदि उपक्रम करून स्वतः भक्तांपुढे निसर्गसंवर्धनासाठी आदर्श घालून देत। महाराजांची शिकवण नेहमी हेच सांगत की मानवाने निसर्गाचा आदर राखून त्याच्याशी समतोल साधत जीवन जगले पाहिजे । "जगा आणि जगू द्या" हा संदेश महाराजांनी कायम प्रसारित केला ।

गगनगिरी महाराजांना विश्व धर्म संसद शिकागो ह्यांच्या वतीने विश्वगौरव विभूषण पुरस्कार अर्पण करण्यात आला।

तपसाधना[संपादन]

महायोगी गगनगिरी महाराजांची इतर वैशिष्ट्ये सध्याच्या कलीयुगामध्येही योगशास्त्रातील अनेकविध अवघड सिद्धी व चमत्कार प्रत्यक्ष आत्मसात केलेले असे ते महायोगी होते. योगशास्त्रातील विमलज्ञान, शिवयोग, उन्मनी विद्या, गोरक्षनाथी विद्या अशा अनेक विद्या त्यांना आत्मसात होत्या. निसर्गाच्या सान्निध्यात अनेक प्रकारची खडतर तपे करून त्यांनी हे अत्यंत अवघड व वैशिष्ट्यपूर्ण ज्ञान आत्मसात केले होते. प.पू. महाराजांनी योगसामर्थ्यांचा संदेश सर्वत्र पोहोचवला. प.पू. महाराजांनी हिमालय व गंगेचे खोरे येथेही तपश्चर्या केली. १९३२ ते १९४० सालापर्यंत महाराजांनी दाजीपूर येथील पाटाचा डंक या भागात राहून अरण्यनिवासी तप केले. १९६५ पासून त्यांची कीर्ती जगभर पसरली. निर्मनुष्य व अनेक हिंस्त्र श्वापदे असणाऱ्या गगनगडावरील ५२ कु़न्डे व सांगलीतील वाटार येथील ५ ते ६ डोहांत त्यांनी दीर्घकाळ जलतपश्चर्या केली. त्यासाठी ते पाण्याच्या तळाशी जाऊन योगिक क्रियांच्या साहाय्याने तेथे ध्यान लावून कित्येक तास बसत असत.

अनुयायी[संपादन]

गगनगिरी महाराजांचे भक्त व अनुयायी महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश, गुजरात, कर्नाटक अशा अनेक राज्यांमध्ये पसरले आहेत. संपूर्ण देशभरात, तसेच जगातही ठिकठिकाणी त्यांचे शिष्य व अनुयायी मोठ्या प्रमाणात आहेत । सांसारिक श्रावकांबरोबरच अनेक साधू , तपस्वी या संन्यासी देखील गगनगिरी महाराजांचे शिष्य होते । हिंदू धर्मातील सर्वात मोठा दशनामी संप्रदाय हा त्यांना प्रामुख्याने मानत । बाळासाहेब ठाकरे, पतंगराव कदम, बाळासाहेब थोरात या अनेक राजकारणी देखील त्याननचे अनुयायी होते ।

समाधी[संपादन]

सिद्धयोगी गगनगिरी महाराज यांनी रायगड जिल्ह्यातील खोपोली येथील गगनगिरी महाराज योगाश्रम पाताळगंगा तीर्थक्षेत्र' आश्रमातील पर्णकुटीत ४ फेब्रुवारी २००८ रोजी पहाटे ३.३० वाजता देह ठेवला.[३] [४]

मठ[संपादन]

पुण्यामध्ये धनकवडी येथे , तळवडे रोडवर आणि त्र्यंबकेश्वरला असे महाराजांच्या नावाचे तीन गगनगिरी महाराज मठ आहेत. कोल्हापूर मधील गगनबावडा येथे गगनगिरी महाराजांचा आश्रम आहे.[४] मुंबई मध्ये मनोरी येथेही गगनगिरी महाराजांचा आश्रम आहे.[५] [६]संगमनेर तालुक्यातील निंमगावजाळी दुधेश्वरगड येथे गगनगिरी महाराजांचा अश्व आश्रम आहे. संगमनेर तालुक्यातील पिंपरणे या गावी गगनगिरी महाराज यांच्या नावाने शाळा व महाविद्यालय आहे. [७]

उत्सव[संपादन]

गगनगिरी महाराजांच्या खोपोली आश्रमात अनेक धार्मिक विधी साजरे केले जातात. गुरुपौर्णिमेला लाखो भाविक खोपोली येथे येतात । कोजागिरी पौर्णिमेला मनोरी आश्रम येथे दरवर्षी लक्षदीप सोहळ्याचे आयोजन केले जाते । [८][९] दत्त जयंती उत्सव हा खोपोली व गंगानगड आश्रमात मोठ्या उत्साहात पर पडतो ।

संदर्भ[संपादन]

  1. ^ "पाटणकर, श्रीपाद गणपत". महाराष्ट्र नायक (इंग्रजी भाषेत). 2023-04-05 रोजी पाहिले.
  2. ^ "पाण्यात उभा राहून ध्यान करणाऱ्या गगनगिरी महाराजांचे पाय माशांनी कुरतडले होते?" (इंग्रजी भाषेत). 2020-03-11. 2023-04-05 रोजी पाहिले.
  3. ^ "Gagangiri Maharaj dead". 2008-02-05. ISSN 0971-8257.
  4. ^ a b "अध्यात्मिक गुरू गगनगिरी महाराज यांचे निधन". Maharashtra Times. 2023-04-05 रोजी पाहिले.
  5. ^ "Homepage - Gagangiri Maharaj Manori Ashram" (इंग्रजी भाषेत). Archived from the original on 2023-04-05. 2023-04-05 रोजी पाहिले.
  6. ^ ऑनलाईन, सामना. "गगनगिरी महाराज चॅरिटेबल ट्रस्टच्या जमिनीच्या भाडेपट्ट्याचे नुतनीकरण | Saamana (सामना)" (इंग्रजी भाषेत). 2023-04-05 रोजी पाहिले.
  7. ^ "P.P.GAGANGIRI MAHARAJ VIDYALAYA PIMPARNE - Pimparne, District Ahmadnagar (Maharashtra)". schools.org.in (इंग्रजी भाषेत). 2023-04-05 रोजी पाहिले.
  8. ^ author/online-lokmat (2018-10-23). "स्वामी गगनगिरी महाराज मनोरी आश्रम येथे लक्षदीप सोहळ्याचं आयोजन". Lokmat. 2023-04-05 रोजी पाहिले.
  9. ^ "Bright and beautiful: Mumbai lit up on Kojagiri Purnima". Hindustan Times (इंग्रजी भाषेत). 2017-10-06. 2023-04-05 रोजी पाहिले.

बाह्य दुवे[संपादन]