खोकड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
खोकड

प्रजातींची उपलब्धता
शास्त्रीय वर्गीकरण
वंश: कणाधारी
जात: सस्तन
वर्ग: मांसभक्षक
कुळ: श्वानाद्य कुळ
जातकुळी: Vulpes
जीव: V. bengalensis
शास्त्रीय नाव
Vulpes bengalensis
आढळप्रदेश
आढळप्रदेश
Vulpes bengalensis

खोकड ( शास्त्रीय नावः Vulpes bengalensis (व्हल्पिस बेंगॉलेन्सिस); इंग्रजी:Bengal Fox ( बेंगाल फॉक्स );) हा भारतीय उपखंडातील पाकिस्तान, भारत, नेपाळ व बांग्लादेश या देशात आढळणारा मांसाहारी वर्गातील सस्तन प्राणी आहे. मांसाहारी गणातील ज्या कुलातला कोल्हा आहे त्याच कॅनिडी कुलातील हा प्राणी आहे.

ह्याचे डोके आणि धड मिळून लांबी ४५–६० सेंमी.; शेपूट २५–३५ सेंमी.; वजन २–३ किग्रॅ. असते. आकाराने लहान व सडपातळ; पाय बारीक; शेपटीचे टोक काळे; शरीराचा रंग करडा किंवा राखी; डोके, मान आणि कानाची मागची बाजू पुसट काळसर; थंडीत याचा रंग पांढुरका होतो पण पाय तांबूसच असतात. हिवाळ्यात उत्तर भारतातील खोकडांना दाट आणि सुंदर केस येतात व त्यांनी थंडीचे निवारण होते.

खोकड मोकळ्या मैदानात राहतो; दाट जंगलात तो नसतो. वाळवंटी प्रदेशालगतच्या वैराण आणि झुडपे असलेल्या भागात तो नेहमी राहतो. काही खोकड लागवडीखालच्या जमिनीत, कालव्यांच्या आसपास किंवा खडकाळ जमिनीत बिळे करून राहतात. बिळात पाणी साठेल असे वाटले, तर लहानशा टेकाडावर तो बीळ करतो. बिळात ६०–९० सेंमी. खोलीवर एक दालन असते; बिळाला अनेक वाटा असतात, काही बंद तर काही दालनात जातात. खोकड निशाचर आहे; दिवसा तो झोप घेतो व तिन्हीसांजेनंतर भक्ष्य शोधण्याकरिता बाहेर पडतो. अंधार दाटून आल्यावर याचे ओरडणे सुरू होते. लहान सस्तन प्राणी, सरपटणारे प्राणी, खेकडे आणि कीटक हा खातो. कलिंगडे, बोरे आणि हरबऱ्याचे घाटे देखील तो खातो. कोंबड्यांवर हा क्वचितच हल्ला करतो. उंदीर व खेकडे यांचा नाश करीत असल्यामुळे हा शेतकऱ्यांना हितकारक आहे.[२]


संदर्भ व नोंदी[संपादन]

  1. ^ Johnsingh, A.J.T. & Jhala, Y.V. (2008). Vulpes bengalensis. इ.स. २००६ असुरक्षित प्रजातींची आय.यू.सी.एन. "लाल" यादी. आय.यू.सी.एन. इ.स. २००६. 2006-05-11ला बघितले. Database entry includes justification for why this species is of Least Concern.
  2. ^ दातार, म. चिं. "खोकड". मराठी विश्वकोश. खंड ४. मुंबई: महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ. ६९१५.