खारफुटी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
पालावान, फिलिपिन्स येथील खारफुटींची वने

खारफुटी ही एक समुद्राजवळ वाढणारी वनस्पती आहे.

उष्ण कटिबंधातील समुद्रकिनाऱ्यावर सागरी लाटांचा प्रभाव असणाऱ्या दलदलयुक्त प्रदेशात आणि नद्यांच्या मुखप्रदेशात आढळणारे सदाहरित लहान वृक्ष किंवा झुडपे. खारफुटी (कच्छ वनस्पती) हा अनेक जातींच्या वनस्पतींचा एक समूह (वनश्री) आहे. खाऱ्या पाण्यात साधारण भरतीच्या पाण्याच्या पातळीपासून ते ओहोटीच्या पाण्याच्या पातळीपर्यंतच्या पट्ट्यात ही वनश्री आढळते. भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर आणि पश्चिम बंगालच्या सुंदरबनमध्ये खारफुटी वाढलेली दिसते. अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांतील फ्लॉरिडा राज्याच्या दक्षिण भागापासून ते मध्य अमेरिकेच्या किनारी भागापर्यंत प्रामुख्याने तांबडी खारफुटी आढळते. याशिवाय कॅलिफोर्नियाचा किनारा, पूर्व आफ्रिका व इंडोनेशिया यांच्या किनारी भागांत ती आढळते.

बाह्य रचना [संपादन]

खारफुटी क्वचित १२ मी.पेक्षा अधिक उंच वाढते. या वृक्षाच्या जाळीदार फांद्या फुलांच्या झुबक्यांनी बहरतात. पाने अंडाकृती व चिवट असतात. फुले लहान, चार पाकळ्यांची, पिवळ्या रंगाची व शंक्वाकृती असतात. फळे लालसर तपकिरी व २५ मिमी. लांबीची असतात. प्रत्येक फळात एकच बी असते. झाडावर लटकत असतानाच त्यांच्या बीजांना अंकुर फुटतात. अंकुर २५-३० सेंमी. लांब वाढतात. ते झाडावर भाल्यासारखे लोंबत राहून खाली पडतात. पाण्यावर तरंगत ते वाहत जातात. खाऱ्या व मऊ चिखलात रुतून त्यांच्यापासून नवीन झाडांची निर्मिती होते. या झाडाच्या खोडातून काही मुळ्या बाहेर वाढतात आणि पुन्हा जमिनीकडे वळून मातीत जातात. त्यामुळे ही नवीन वनस्पतींची निर्मिती होते. खारफुटीमधील अनेक वनस्पतींमध्ये जाड व मांसल पाने, टेकूप्रमाणे आधार देणारी मुळे आणि जमिनीतून बरीच वर वाढणारी काही श्वसनमुळे ही वैशिष्ट्ये आढळतात. एकदा तोडल्यावर पुन्हा जलद वाढण्याबद्दल ही झाडे प्रसिद्ध आहेत. या वृक्षांची मुळे व फांद्या यांच्या जाळीदार अडथळ्यामुळे सागराकडून वाहत आलेला गाळ व लाकडे अडविली जातात. त्यामुळे तेथे घट्ट जमीनयुक्त नैसर्गिक बांध निर्माण होतात. खारफुटीचे लाकूड चमकदार असले, तरी आर्थिक दृष्ट्या ते फारसे उपयुक्त नसते. मोठ्या झाडांचे लाकूड बंदरातील गोदी व धक्के बांधण्यासाठी वापरले जाते. कारण या वनस्पतीचे लाकूड पाण्यात कुजत नाही, तसेच त्याला कीड लागत नाही. तांबड्या खारफुटीच्या सालीपासून टॅनिन हा पदार्थ मिळतो. टॅनिनचा उपयोग कातडी कमाविण्यासाठी, रंगविण्यासाठी व माशांची जाळी मजबूत बनविण्यासाठी केला जातो. आग्नेय आशियात या लाकडाचा उपयोग बांधकामासाठी, लोणारी कोळसा तयार करण्यासाठी आणि सरपण म्हणून केला जातो. खारफुटीच्या दाट झाडीमुळे समुद्र व जमीन तसेच खाडी, किनारा व त्यावरील प्रदेश यांत एक हिरवी भिंत निर्माण होते. त्यामुळे किनाऱ्याजवळच्या जमिनीची पाण्यापासून होणारी धूप थांबते. भूसंरक्षणाच्या दृष्टीने या वनस्पती अतिशय महत्त्वाच्या आहेत. त्यांच्यामुळे इतर वनस्पती व जीवसृष्टीचे संरक्षण होते. जलचर प्राण्यांना संरक्षण मिळते. मासे, खेकडे, झिंगे वगैरे प्राणी येथे अंडी घालतात. पिले मोठी झाली की समुद्राकडे जातात. या वनस्पतीसमुहात झिंगे चांगले वाढतात. खारफुटीची वने असलेल्या सर्व ठिकाणी सागरी लाटांपासून संरक्षण मिळते. खारफुटीच्या चार जाती अमेरिका व आफ्रिकेच्या पश्चिम किनाऱ्यावर प्रामुख्याने आढळतात. पूर्व आफ्रिका, आशिया व पश्चिम पॅसिफिक भागांत दहा जाती मिळतात. सुंदरबनातील खारफुटीत बारा कुलांतील सु. एकवीस जाती सापडतात. सागरकिनार्याचं रक्षण करण्यासाठी सरकारने भलेही नौसेनेचा एखादा विभाग स्थापन केला असेल. मात्र खऱ्या अर्थाने तटरक्षकाची भूमिका चोख बजावतात ती किनार्यावर असणारी खारफुटीची किंवा तिवरांची जंगलं. या जंगलांच्या संरक्षणासाठी आपण साऱ्यांनी जागरूकतेने प्रयत्न करायला हवेत.. पर्यावरणविषयक जाण आता आपल्याला बऱ्यापैकी आली आहे, असं म्हणायला हरकत नाही. झाडं लावायला हवीत इथपासून झाडं जगवायला हवीत इथपर्यंत आपण पोहोचलो आहोत. पण जमिनीवर झाडं लावतानाच किनारपट्टीवरच्या खारफुटी किंवा तिवरांना विसरून चालणार नाही. खारफुटी किंवा तिवर ही एकाच प्रकारच्या वनस्पतींची दोन नावं आहेत. इंग्रजीमध्ये याला ‘मॅनग्रोव्ह’ असं म्हणतात. खारफुटी ही चिखलात, घट्ट माती नसलेल्या जागी आणि भरतीचं पाणी घुसणाऱ्या भागात वाढते. या झाडांना खारफुटी हे नावदेखील विशिष्ट कारणामुळे पडलं आहे. तिवरांची मुळं समुद्राच्या पाण्यातलं मीठाचं प्रमाण सहन करू शकतात आणि लाटांबरोबर होणारी जमिनीची धूप थांबवतात. यामुळेच त्यांना खारफुटी म्हणतात.   तिवरांचं महत्त्व एवढय़ावरच थांबत नाही. ही वैशिष्टय़पूर्ण झाडं आहेत. या झाडांच्या मुळांना सतत पाण्यात राहावं लागतं. त्यामुळे त्यांना ऑक्सिजन सतत कमी पडतो. परिणामी तिवरांची मुळं ही जमिनीतून वर, उलटी वाढतात! सर्वसाधारणपणे झाडाची मुळं खाली वाढत असताना ही मुळं मात्र जमिनीतून वर येतात आणि मोकळ्या हवेत श्वास घेतात. तिवरांची लागवड करण्यासाठी तिवरांच्या बिया गोळा करण्याची गरज बऱ्याचदा नसते. हे झाड आपल्या लागवडीसाठी स्वतःच सोय करतं. याच्या बिया जड, मोठय़ा असतात. याचं कारण स्पष्ट आहे. सतत दलदलीमध्ये, चिखलात किंवा समुद्राच्या लाटांच्या तडाख्यात राहावं लागत असल्यामुळे जितकं जड बी तितकं ते भुसभुशीत जमिनीत घट्ट राहण्याची शक्यता अधिक. या बिया जमिनीवर पडून रुजतात, असं म्हणण्यापेक्षा त्यांची रुजण्याची प्रक्रिया झाडावरच सुरू होते, असं म्हणणं अधिक योग्य ठरेल. निसर्गाकडूनच जणू काही आपल्याला तिवराचं तयार रोपटं करून दिलं जातं. हे रोपटं जमिनीवर पडल्याबरोबर रुजतं आणि लगेच जमिनीची धूप थांबवण्याचं काम सुरू करतं! याच्या मुळांना शाखांचं जाळं असतं. त्यामुळे पटकन रुजायला मदत मिळते. तिवरांच्या जतनाची आज गरज आहे. किनारपट्टीची धूप थांबवणं, या एकाच उद्देशानं हे जतन मात्र होता कामा नये. या जतनामागची कारणं समजून घ्यायला हवीत. कोकण किनारपट्टीचा विचार केला तर जमिनीची धूप थांबवणं हा मुख्य उद्देश ठेवायला हरकत नाही. रत्नागिरी आणि गोवासारख्या ठिकाणी किनारा खचणं, ही आता नित्याचीच बाब झाली आहे. हा किनारा खचण्यासाठी निसर्गापेक्षा आपण कारणीभूत आहोत, हे लक्षात घ्यायला हवं. तुम्ही कोकण किनारपट्टीच्या प्रदेशात राहात असाल आणि तुमच्या नारळाच्या वाडीजवळची तिवरांची झाडं नष्ट झाली असतील तर वेळीच जागे व्हा, पायाखालची जमीन सरकणं म्हणजे काय याचा लवकरच तुम्हाला प्रत्यय येणार आहे, हे ध्यानात घ्या! अशा वेळी तुम्ही तिवरांची लागवड करू शकता. किनारपट्टीपासून थोडं आत, पुळणीच्या किंवा खाडीच्या भागाकडे या. इथे तिवरांचा उपयोग आणखी एका कारणासाठी होतो. इथे बऱ्याचदा कोणत्या ना कोणत्या नदीचं मुख येऊन मिळालेलं असतं. या मुखापाशी माशांची पैदास चांगली होते. तसंच माशांना आवश्यक असणारे प्लँक्टनासारखे एकपेशीय जीवही इथं चांगल्या प्रकारे वाढतात. शिवाय विविध प्रकारचे कोळी, पक्षी, पाणकावळे, पाणबगळे, गरुड, साप यांची वाढही इथं चांगली होते. एकंदरीत संपूर्ण जीवसाखळी या भागात आकाराला येऊ शकते. यामुळे पुळणीचा किंवा खाडीचा भाग तिवरांनी समृद्ध असणं आवश्यक आहे. बॅक वॉटर, खाडी किंवा पुळण या भागात केवळ तिवरांच्या अस्तित्वामुळे किती जैवविविधता असू शकते, याचं उत्तम उदाहरण म्हणजे पश्चिम बंगालचा सुंदरबन प्रदेश. तिवरांमुळे वादळांचा तडाखा सौम्य होऊ शकतो. हा अनुभव आपण ओरिसा, आंध्र प्रदेश आणि पश्चिम बंगाल या राज्यांच्या किनारपट्टीवर येऊन थडकणाऱ्या वादळांच्या वेळी घेतला आहे.

ओरिसाच्या किनारपट्टीवर २९ ऑक्टोबर १९९९ रोजी ताशी २६० किलोमीटर इतक्या प्रचंड वेगाने वादळ आलं होतं. या वादळाचा तडाखा ओरिसाच्या १० जिल्ह्यांना बसला होता. वाऱ्याचा हा वेग तिवरांनी अडवला असता. जिथं तिवरांची वाढ झाली होती, तिथं हा वेग बऱ्यापैकी अडवला गेला. तिवरांमुळे जीवसृष्टीही टिकून राहते. समशीतोष्ण हवामानात उत्पन्न होणाऱ्या सागरी माशांपैकी ९० टक्के माशांच्या जीवनसाखळीत तिवरांचा संबंध एकदा तरी येतोच. सुंदरबन भागातल्या सागरी मगरींचं तिवर किंवा खारफुटी हे मोठं आश्रयस्थान आहे. खारफुटीच्या जंगलात जन्माला आलेली सागरी मगर ८ मीटपर्यंत वाढू शकते! अनेक परजीवी वनस्पती खारफुटीच्या अधाारानं वाढतात. सरकारलाही खारफुटी वाचवायला हवी, अशी जाग आली आहे, हे आपलं सुदैवच. या दृष्टीने सुंदरबन परिसरात १९९१पासून प्रयत्न सुरू आहेत.

खारफुटीसारखं झाड वरवर पाहता अगदी सामान्य रूपाचं, पण असमान्य कर्तृत्वाचं. कुठल्याही प्रकारच्या खताची अपेक्षा न ठेवणारं, चांगल्या हवामानाची इच्छा न बाळगणारं आणि सतत लक्ष देण्याची अपेक्षा न धरणारं, अशी ही निष्काम कर्मयोगी खारफुटी हजारो जीवांचं आश्रयस्थान मात्र नक्कीच आहे. मानवाच्या अस्तित्वाच्या रक्षणासाठी अहोरात्र उभा तटरक्षक असंच या खारफुटीला म्हणावं लागेल! 

किनार्यावरील खारफुटीने व्यापलेला प्रदेश

राज्य चौरस कि.मी.   टक्केवारी पश्चिम बंगाल २१२५ ४३.६३ गुजरात १०३१ २१.१७ अंदमान, निकोबार ९६६ १९.८३ आंध्र प्रदेश ३९७ ८.१५ ओरिसा २१५ ४.४१ महाराष्ट्र १०८ २.२२ तमिळनाडू २१ ०.४३ गोवा ५ ०.१० कर्नाटक ३ ०.०६ एकूण ४८७१

१००.०० खाडीकिनारी असलेल्या खारफुटींची सर्रास कत्तल होत असून, खारफुटींचे जंगल उद्‌ध्वस्त करून झोपड्या उभारणाऱ्यांच्या विरोधात पालिकेचा महसूल विभाग मूग गिळून राहिल्याचे पाहावयास मिळत आहे. महसूल विभागाने आक्रमक होऊन कारवाई न केल्यास कळव्यातून जाताना डाव्या बाजूने जशी पक्की घरे उभी राहिली आहेत तशीच उजव्या बाजूलाही चाळींची दाटीवाटी पाहावयास मिळण्याची शक्‍यता आहे.

26 जुलैच्या पूरस्थितीमध्ये खाडीकिनारी असलेल्या खारफुटीचे महत्त्व अधोरेखित झाले होते. खाडीकिनारी घुसलेल्या पाण्यामुळे अनेक संसार होत्याचे नव्हते झाले होते. ज्या ठिकाणी खारफुटी मोठ्या प्रमाणात होती त्या ठिकाणी पुराचा फटका बसला नव्हता. त्यानंतर केवळ खारफुटीचा बचाव नव्हे, तर खारफुटीचे संवर्धन करण्याला प्राधान्य देण्यात आले होते. आता केंद्र शासनाच्या निर्णयाप्रमाणे खारफुटीला वन कायदा लागू आहे. वन कायद्याच्या धाकामुळे आजच्या घडीला देशभरातील जंगल वाचलेले पाहावयास मिळत आहे; पण मुळात खारफुटीला वन कायदा लागू होऊनही त्याची कठोर अंमलबजावणी होताना दिसत नाही. मध्यंतरी ठाणे महापालिकेने मुंबईच्या धर्तीवर ठाणे परिसरातील खारफुटीचे क्षेत्र निश्‍चित करण्याची मागणी शासनाकडे केली होती. एक स्थानिक स्वराज्य संस्था याबाबतीत अशा प्रकारे पुढाकार घेत असताना थेट शासनाशी संबंध असलेला महसूल विभाग अथवा स्थानिक तहसीलदार हातावर हात धरून बसल्याचे पाहावयास मिळत आहे. महापालिकेकडून अनेक वेळा बोटींमधून खारफुटीची पाहणी करून कोठे कोठे खारफुटी विरळ होत आहे याचा अंदाज घेतला जात आहे; पण महसूल विभागाने केवळ रेती उत्खननमाफियांवर कारवाई करताना खारफुटींच्या संवर्धनाकडे दुर्लक्ष केल्याचे स्पष्ट होत आहे. कळवा परिसरात वेगाने होत असलेल्या खारफुटीच्या ऱ्हासाला महापालिकेबरोबरच महसूल विभागही तेवढाच जबाबदार असल्याचे दिसते आहे.


Wiki letter w.svg
कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.