करीना कपूर
| करीना कपूर | |
करीना कपूर (इ.स. २०११) |
|
| जन्म | सप्टेंबर २१, इ.स. १९८० मुंबई, महाराष्ट्र |
| अन्य नाव/नावे | बेबो |
| कार्यक्षेत्र | अभिनय (चित्रपट) |
| भाषा | हिंदी |
| कारकिर्दीचा काळ | इ.स. २००० - चालू |
करीना कपूर (सप्टेंबर २१, इ.स. १९८०; मुंबई, महाराष्ट्र - हयात) ही हिंदी चित्रपटांतील भारतीय अभिनेत्री आहे.
रेफ्युजी (इ.स. २०००) या चित्रपटाद्वारे चित्रपटसॄष्टीत पदार्पण करुन, तिने त्या वर्षीचा सर्वोत्कृष्ट नवोदित नायिकेचा फिल्मफेअर पुरस्कार पटकावला. परंतु मुझे कुछ कहेना है (इ.स. २००१) या तिच्या दुसर्या चित्रपटाने तिला व्यावसायिक यश मिळवून दिले. त्याच वर्षी आलेल्या कभी खुशी कभी गम या करण जोहर-दिग्दर्शित चित्रपटाने हिंदी चित्रपटाचे परदेशातील व्यवसायाचे सर्व उच्चांक मोडण्याएवढे यश कमवले. या चित्रपटातील तिच्या भूमिकेचे मोठे कौतुक झाले आणि याच चित्रपटाने तिला आजवरच्या तिच्या कारकिर्दीतले सर्वाधिक व्यावसायिक यश मिळवून दिले. यानंतर करिनेने भरपूर चित्रपट केले; परंतु ते सर्व तिकीटखिडकीवर अपयशी ठरले. या काळात एकाच पठडीच्या भूमिकांमध्ये अडकून पडल्याबद्दल तिच्यावर टीकाही झाली. चमेली (इ.स. २००४) चित्रपटातील तिची भूमिका तिच्या कारकिर्दीला वळण देणारी ठरली. या चित्रपटातील भूमिकेसाठी तिला फिल्मफेअर विशेष पुरस्कार मिळाला. नंतर समीक्षकांनी नावाजलेल्या देव (इ.स. २००४) आणि ओंकारा (इ.स. २००६) या चित्रपटांसाठी तिला समीक्षकांचे दोन फिल्मफेअर पुरस्कार मिळाले. इ.स. २००७ साली करिनेने तिच्या जब वी मेट चित्रपटातील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्मफेर पुरस्कार पहिल्यांदा पटकवला. विशेष गाजलेले चित्रपट न देतासुद्धा करिनेने आघाडीची अभिनेत्री म्हणून स्थान मिळवले आहे.
अनुक्रमणिका |
[संपादन] आरंभिक जीवन आणि कुटुंब
हिंदी चित्रपटसृष्टीत सुप्रसिद्ध असलेल्या कपूर घराण्यातल्या रणधीर कपूर आणि बबिता यांच्या पोटी करिना दुसरी मुलगी म्हणून जन्माला आली. रणधीर कपूर याच्या म्हणण्याप्रमाणे हिचे पहिले नाव आना कारेनिना या पुस्तकावरून ठेवण्यात आले आहे.[१] करिना ही राज कपूर यांची नात आहे आणि पृथ्वीराज कपूरची पणती आहे. करिष्मा कपूर ही हिंदी चित्रपटांतील अभिनेत्री करिनेची मोठी बहीण आहे. ऋषी कपूर आणि नीतू सिंग यांची ती पुतणी आहे.
कपूर घराण्याच्या कौटुंबिक परंपरेप्रमाणे करिनेनेही लग्न करून स्थिरस्थावर व्हावे, अशी तिच्या वडिलांची इच्छा होती; कारण कपूर घराण्यातल्या बायकांनी चित्रपटात काम करणे हे चांगले समजले जात नसे.[२] याच कारणामुळे तिच्या आईवडिलांमधील दुरावा वाढला आणि बबिता आपल्या मुलींसह वेगळी राहू लागली.[३] करीनाचा सांभाळ तिच्या आईनेच केला. इ.स. १९९१ साली तिची बहिण चित्रपटांमध्ये काम करेपर्यंत आईने प्रचंड कष्टामध्ये दिवस काढले. ती दोन नोकर्या करत असे.[४]
करिनेने जमनाबाई नर्सी स्कूल, मुंबई आणि नंतर वेल्हाम गर्ल्स, देहरादून बोर्डिंग शाळेत शिक्षण घेतले. त्यानंतर मिठीबाईमधून वाणिज्य शाखेची पदवी घेतल्यावर तिने ३ महिन्यांचा उन्हाळी अभ्यासक्रम हार्वर्ड विद्यापीठामधून पूर्ण केला.[५]
[संपादन] चित्रपट कारकीर्द
[संपादन] संदर्भ
- ↑ इंडीयाएफएम न्यूज ब्यूरो (२९ डिसेंबर, इ.स. २००४). व्हॉट्स अ बुक गॉट टू डू विथ करीना ?. इंडियाएफएम. २७ जानेवारी, इ.स. इ.स. २००७ रोजी पाहिले. (इंग्लिश मजकूर)
- ↑ स्क्रीन वीकली (२४ सप्टेंबर, इ.स. २००७). द फॅमिलीज दॅट हॅव चेंज्ड द फेस ऑफ बॉलिवूड. इंडियाएफएम. २६ सप्टेंबर, इ.स. इ.स. २००७ रोजी पाहिले. (इंग्लिश मजकूर)
- ↑ ललवाणी,विकी (१० ऑक्टोबर, इ.स. २००७). रणधीर-बबिता बॅक टुगेदर!. द टाइम्स ऑफ इंडिया. २० ऑक्टोबर, इ.स. इ.स. २००७ रोजी पाहिले. (इंग्लिश मजकूर)
- ↑ ठकरानी, अनिल (१६ डिसेंबर, इ.स. २००७). बेबो, फुल-ऑन. मुंबई मिरर. २७ डिसेंबर, इ.स. इ.स. २००७ रोजी पाहिले. (इंग्लिश मजकूर)
- ↑ वर्मा, सुकन्या (१८ मे, इ.स. २००). आय डू नॉट इंटेंड डुइंग द डेव्हिड धवन काइंड ऑफ फिल्म्स. रेडिफ.कॉम. २१ ऑक्टोबर, इ.स. इ.स. २००६ रोजी पाहिले. (इंग्लिश मजकूर)
[संपादन] बाह्य दुवे
| विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |
- अधिकॄत संकेतस्थळ. (इंग्लिश मजकूर)
- करीना कपूर आय.एम.डी.बी. संकेतस्थळावर (इंग्लिश मजकूर)