ऑरेलियन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ऑरेलियन
४४ वा रोमन सम्राट
अधिकारकाळ सप्टेंबर २७० ते सप्टेंबर/ऑक्टोबर २७०
पूर्ण नाव ल्युशियस डॉमिशियस ऑरेलियानस (राज्यारोहणपूर्व)
ल्युशियस डॉमिशियस ऑरेलियानस ऑगस्टस (राज्यारोहणोत्तर)
जन्म ८ सप्टेंबर, इ.स. २१४ किंवा २१५
सिर्मियम, पॅनोनिया इन्फरियर (आजचे स्रेम्स्का मिट्रोव्हिका, सर्बिया)
मृत्यू सप्टेंबर किंवा ऑक्टोबर इ.स. २७५ (वय ६०-६१)
कॅनोफ्रुरियम, थ्रेस (आजचा तुर्कस्तान)
पूर्वाधिकारी क्विंटिलस
उत्तराधिकारी टॅसिटस
आई ऑरेलियस घराण्याची मुक्त केलेली गुलाम व तिच्या गावामधील सोल इन्व्हिक्टस ची (अजिंक्य सूर्य) पुजारीण
पत्नी उल्पिया सेव्हरिना

ऑरेलियन (लॅटिन लुसियस डॉमिशियस ऑरेलियानस ऑगस्टस, ८ सप्टेंबर २१४ किंवा २१५ - सप्टेंबर किंवा ऑक्टोबर २७५) हा इ.स. २७० ते २७५ दरम्यान रोमन सम्राट होता. सामान्य परिस्थितीत जन्मलेल्या ऑरेलियनने सैन्यामध्ये देदिप्यमान कामगिरी करून सम्राटपद मिळवले. सम्राट झाल्यानंतर त्याने मोठ्या विध्वंसकारक युद्धात अलेमानी या जर्मन टोळ्यांचा पराभव केला. तसेच त्याने उत्तरेकडील गॉथ, व्हॅन्डाल, जुथुन्गी व ईशान्येकडील सार्मेशियन व कार्पाय या लोकांचा पराभव केला. इ.स. २७३ मध्ये त्याने पूर्वेकडील पाल्मिराचे साम्राज्य हा स्वतंत्र झालेला रोमन प्रदेश जिंकून घेतला व पुढील वर्षी पश्चिमेकडील गालिक साम्राज्याचा पराभव फ्रान्स व ब्रिटनचा प्रदेश रोमन साम्राज्यास पुन्हा जोडून घेतला. त्याच्या आदेशाने रोममध्ये ऑरेलियन भिंती बांधण्यात आल्या व डॅशियाच्या प्रांतातून माघार घेण्याचा निर्णयही त्याचाच होता.

रोमन साम्राज्यास तिसऱ्या शतकातील संकटपर्व संपवण्यासाठी त्याचे हे विजय कारणीभूत असल्याने ऑरेलियनला रेस्टिट्युटर ऑर्बिस (लॅटिन: Restitutor Orbis) म्हणजे 'विश्वाचा पुनर्स्थापक' ही उपाधी देण्यात आली. सम्राट डोमिशियन हा डॉमिनस एट् ड्यूस (लॅटिन: dominus et deus, स्वामी व देव) ही पदवी लावणारा पहिला सम्राट असला तरी अशा पदव्या ऑरेलियनच्या कारकिर्दीपर्यंत अधिकृत कागदपत्रांवर लिखित स्वरूपात नव्हत्या. फ्रान्समधील ओर्लेयों या शहराचे नामकरण ऑरेलियनवरून करण्यात आले आहे.

सुरुवातीचे आयुष्य[संपादन]

ऑरेलियनचा जन्म इ.स. २१४ च्या ९ सप्टेंबर रोजी झाला, परंतु त्याचे जन्मवर्ष इ.स. २१५ सुद्धा असण्याची शक्यता आहे. त्याच्या जन्मस्थानाबाबत प्राचीन स्रोतांत एकमत नसले तरी तो मूळचा इलिरिकम या प्रदेशातील असल्याचे मानले जाते. डॅन्युबच्या पलीकडील डेशियातून माघार घेतल्यावर सम्राट ऑरेलियनने वसवलेले सिर्मियम हे पॅनोनिया इन्फरियर या प्रांतातील (आजचे स्रेम्स्का मिट्रोव्हिका, सर्बिया) शहर त्याचे जन्मगाव असल्याचे मानले जाते. ऑरेलियनचा जन्म सामान्य घरात झाला व त्याचे वडील हे शेतकरी होते व त्यांनी आपले रोमन नाव हे त्यांच्या ऑरेलियस घराण्याचा संसद सदस्य असलेल्या जमीनदाराकडून घेतले यावर इतिहासकारांचे एकमत आहे. ऑरेलियनचे कुटुंब हे मूळचे रोमन असल्याचे व समाजाच्या उच्चस्तरावर असल्याचे सॉंडर्स या इतिहासकाराने मांडले आहे परंतु त्याच्या मतास सदर्न व वॅटसन अशा नंतरच्या इतिहासकारांनी समर्थन दिलेले नाही.

प्राचीन स्रोतांमधील पुराव्यांनुसार ऑरेलियनची आई ही ऑरेलियस वंशाची मुक्त केलेली गुलाम व तिच्या गावातील सूर्यदेवाची पुजारीण असल्याचे मांडले गेले होते. तसेच रोममधील सूर्यदेवाच्या पंथाची देखभाल करण्याचे कार्य ऑरेलियस घराण्याकडे दिले गेले होते. या दोन गोष्टींमुळे सम्राट झाल्यावर ऑरेलियनने दाखवलेली सूर्यदेवावरील श्रद्धेचे स्पष्टीकरण करता येते. परंतु आता हा तर्क केवळ शंकास्पद माहितीवरून काढलेला निष्कर्ष एवढाच समजला जातो.

लष्करी कारकीर्द[संपादन]

इ.स. २३५ च्या सुमारास वयाच्या विसाव्या वर्षी ऑरेलियन सैन्यात दाखल झाल्याचे मानले जाते. त्याचबरोबर समाजाच्या सर्वांत कनिष्ठ स्तरावर असल्याने तो लीजन (रोमन सैन्यदळे) यांमध्ये भरती झाल्याचे गृहीत धरले जाते.

सम्राट[संपादन]

मृत्यू[संपादन]