ईश्वर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सिस्टाईन चॅपेलमधील मायकेलेंजेलोने बनविलेले भित्तिलेपचित्र : पाश्चात्य कलेतील 'पिता' ईश्वराचे उत्कृष्ट उदाहरण

ईश्वर ह्या संज्ञेने एकेश्वरवादात एका देवतेचा उल्लेख केला जातो किंवा अनेकेश्वरवादात एकतत्त्वीय देवतेचा निर्देश केला जातो.[१] अतिनैसर्गिक निर्माता आणि मानवजात व विश्वाचा नियंत्रक म्हणून ईश्वराला संकल्पित केले जाते. ईश्वरवाद्यांनी ईश्वराच्या विविध संकल्पनांना विविध गुण आरोपिलेले आहेत. त्यांमध्ये प्रामुख्याने सर्वज्ञता (अमर्याद ज्ञान), सर्वशक्तिमानता (अमर्याद सामर्थ्य), सर्वव्यापकता (सर्वत्र असणे), सर्वकल्याणदृष्टी (परिपूर्ण चांगुलपणा), दैवी सरलता आणि शाश्वत व आवश्यक अस्तित्व यांचा समावेश होतो.

ईश्वर अमूर्त (द्रव्याने न बनलेला), वैयक्तिक अस्तित्व, समग्र नैतिक बंधनांचा स्रोत आणि "ज्याची कल्पना केली जाऊ असते असे सर्वश्रेष्ठ अस्तित्व" याही मार्गांनी संकल्पित केला गेलेला आहे. प्रारंभीच्या ज्यू, ख्रिश्चन आणि मुस्लिम ईश्वरवादी तत्त्वज्ञांनी वेगवेगळ्या पातळ्यांवर या गुणारोपांचे समर्थन केले. अनेक उल्लेखनीय मध्ययुगीन आणि आधुनिक तत्त्वज्ञांनी ईश्वरास्तित्वाच्या बाजूने आणि त्याच्या विरोधात युक्तिवाद केले आहेत.[२]

ईश्वराची विविध नावे आहेत आणि वेगवेगळ्या सांस्कृतिक परिदृष्यांमध्ये ईश्वर कोण आहे आणि त्याच्याजवळ कोणते गुण आहेत यानुसार ती उद्भ्वलेली आहेत. हिब्रू बायबलमध्ये "आय अ‍ॅम दॅट आय अ‍ॅम" आणि वायएचव्हीएच ही चार मुळाक्षरे (टेट्राग्रामॅटन) ईश्वराची नावे म्हणून वापरलेली आहेत; तर ख्रिश्चन धर्मात याहवेह व जेहोवा ही वायएचव्हीएचची नादरूपे म्हणून वापरलेली आढळतात. अरबी भाषेत अल्ला हे नाव वापरले जाते आणि अरबी भाषिकांमध्ये मुस्लिमांचे प्राबल्य असल्याने "अल्ला" या नावासोबत इस्लामी श्रद्धा आणि संस्कृतीचे निर्देश येतात. इस्लाममध्ये ईश्वरासाठी अनेक नावे आहेत तर यहुदी धर्मात इलोहिम व अडोनाई या मुख्य नावांनी ईश्वराला ओळखले जाते. हिंदू धर्मात ब्रह्म हे एकतत्त्ववादी दैवत मानले जाते.[३] इतर धर्मांमध्येही ईश्वरासाठी नावे आहेत : नमुन्यादाखल बहाई पंथात बहा,[४] शीख धर्मात वाहेगुरू[५] आणि झरतुष्ट्रमतात अहुर मज्द.[६]

संदर्भ व नोंदी[संपादन]

  1. Swinburne, R.G. "God" in Honderich, Ted. (ed)The Oxford Companion to Philosophy, Oxford University Press, 1995.
  2. Platinga, Alvin. "God, Arguments for the Existence of," Routledge Encyclopedia of Philosophy, Routledge, 2000.
  3. Pantheism: A Non-Theistic Concept of Deity - Page 136, Michael P. Levine - 2002
  4. A Feast for the Soul: Meditations on the Attributes of God : ... - Page x, Baháʾuʾlláh, Joyce Watanabe - 2006
  5. Philosophy and Faith of Sikhism - Page ix, Kartar Singh Duggal - 1988
  6. The Intellectual Devotional: Revive Your Mind, Complete Your Education, and Roam confidently with the cultured class, David S. Kidder, Noah D. Oppenheim, page 364