अथर्व

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

अथर्व (किंवा अथर्वन्) – काळ - वैदिकपूर्व काळ.

स्थान – वैदिकपूर्व आर्यांचा निवासभाग (मध्य आशिया किंवा वायव्य भारत).

अग्नीचा शोध हा मानवी इतिहासातला एक अतिशय महत्त्वाचा टप्पा आहे. शस्त्रांपासून लिपीपर्यंत अनेक शोधांचे जनक आपल्याला ठाऊक नसले तरी अग्नीसारख्या आद्य शोधाच्या संशोधकांचे नाव आपल्या प्राचीन ऐतिहासिक, सांस्कृतिक, वाङमयीन व वैज्ञानिक ठेव्यात म्हणजेच वेदांमध्ये नोंदवलेले आढळते.

जंगलातील सर्व प्राणी आगीला घाबरतात. प्राचीन काळचा मानवही आगीला घाबरत असे. परंतु, वणव्याच्या आगीत खरपूस झालेल्या पदार्थांची चव फारच चांगली लागते हेही मानवाला अनुभवातून माहित झालेले होते.

लाकडावर लाकूड घासले असता घर्षणामुळे ती लाकडे गरम होतात. असे खूप वेळ चालू राहिल्यास ती लाकडे खूप गरम होतात आणि अखेर पेट घेतात, ही गोष्ट अथर्व यांनी जंगलात लागलेल्या वणव्यांच्या निरीक्षणांमधून शोधून काढली. या गोष्टीचा वापर करून हवा तेव्हा अग्नी निर्माण करता येईल हे अथर्वांनी ताडले.

वारा वेगाने वाहतो तेव्हा झाडांच्या फांद्या एकमेकींवर घासून आग निर्माण होते. अशी आग आपल्याला कशी निर्माण करता येईल यावर अथर्वांनी विचार केला. त्यातून त्यांना एक युक्ती सुचली. एक लाकूड खाली ठेवून त्यावर दुसरे लाकूड रवी प्रमाणे घुसळले तर दोन्ही लाकडे सहजपणे एकमेकांवर खूप वेळ घासत राहणे शक्य होईल आणि याचा वापर करून ती लाकडे पेटवता येतील, असे त्यांना वाटले. या युक्तीचा वापर करून अथर्वांनी प्रत्यक्षात अग्नी निर्माण करून दाखवला. अशा रीतीने, हवा तेव्हा अग्नी निर्माण करण्याच्या प्रक्रियेचा शोध अथर्वांनी लावला. मंथन करून अग्नी हुकमीपणे प्रज्वलित करण्याची पद्धत शोधून काढल्याबद्दल अथर्वांना प्रमंथी असे नावही बहाल केलेले आढळते.

अग्नीच्या शोधामुळे मानवाच्या प्रगतीचा मार्ग खुला झाला. अन्न शिजवण्यापासून धातुकामापर्यंत अनेक गोष्टी मानवाला शक्य झाल्या. किंबहुना, अथर्वांनी लावलेला अग्नीचा शोध ही तंत्रज्ञानाची गंगोत्रीच ठरली.

संदर्भ[संपादन]

शोधांच्या जन्मकथा - भाग १, लेखिका- नंदिनी थत्ते, ग्रंथघर प्रकाशन, आवृत्ती - १९८९, पान १ - ३, पान ५३.