अगस्त्य

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Disambig-dark.svg


अगस्त्याचे शिल्प

अगस्त्य (नामभेद: अगस्त्य मैत्रावरुणि, अगस्ति ;) हा हिंदू पुराणांमध्ये उल्लेख असलेला एक सूक्तरचनाकार ऋषी होता. याने आर्यावर्ताच्या दक्षिणेकडील भूप्रदेशात आर्यांच्या वसाहतीकरणाची सुरुवात करणारा तो आद्य वसाहतकार होता, असे मानले जाते {[१]. विदर्भाचा राजा निमि याच्या लोपामुद्रा नामक कन्येशी अगस्त्याचा विवाह झाला. अगस्त्यापासून लोपामुद्रेला इघ्मवाह ऊर्फ दृढस्यु नावाचा पुत्र झाला.

अगस्त्याचा जन्माबद्दल ॠग्वेदात चमत्कृतिपूर्ण कथा सांगितली आहे. उर्वशीला पाहून कामोत्तेजित झालेल्या मित्रावरुणाचे रेत गळून कमळाच्या पानावर सांडले व पुढे कुंभात ठेवल्यावर त्यातून वसिष्ठ व अगस्त्याचा जन्म झाला.

अगस्त्याच्या उर्वरित आयुष्यातील प्रसंगांबद्दलही विस्मयकारक आख्यायिका आढळतात. महाभारतात अगस्त्याने केलेल्या समुद्रप्राशनाची कथा नोंदवली आहे. देवांशी वैर धरलेले कालकेय दानव समुद्राच्या तळाशी जाऊन लपल्यावर अगस्त्याने अख्खा समुद्र पिऊन कालकेयांना ठार मारले व देवांवरील संकट निवारले. याबरोबरच त्याने वातापि नावाच्या दैत्यास आपल्या जठराग्नीने पचवून त्याचा भाऊ इल्वलास शरण आणले.

महाभारतात अन्यत्र अगस्त्य विंध्य पर्वताचा गुरू असल्याचे उल्लेख आहे. प्राचीन काळी विंध्य उंचीने सतत वाढत असल्यामुळे त्याला गर्व झाला. अगस्त्य दक्षिणेस जात असताना विंध्य त्यास आडवा आला व गुरू असलेल्या अगस्त्यापुढे नमला. अगस्त्याने त्याला आपण दक्षिणेकडून परतेपर्यंत आहे त्या स्थितीच स्थिरावण्यास सांगितले. परंतु दक्षिणेकडे गेलेला अगस्त्य न परतल्यामुळे विंध्य कायमचा विनतावस्थेत राहिला व आर्यांवर्ताचा दक्षिणदेशाशी संपर्क स्थापन झाला.

त्रेता युगातही राम, सीता व लक्ष्मण वनवासात हिंडताना अगस्त्याश्रमात आले व अगस्त्याला भेटले अशी कथा आहे. त्यावेळी अगस्त्याने रामास रावणाचा अंत करू शकणारा बाण दिला.

[संपादन] संदर्भ

  1. चित्राव, सिद्धेश्वरशास्त्री (इ.स. १९६८). भारतवर्षीय प्राचीन चरित्रकोश. (मराठी मजकूर) 

[संपादन] बाह्य दुवे

http://www.gokarnamahabaleshwar.com/sthalmahatmya/sthal_agasti.html

वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये